Thursday, May 18, 2023

थोडं मनातलं -001

नमस्कार ! 
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे … उन 'मी ' म्हणतंय … सकाळी १० वाजल्यानंतर बाहेर जाणं जिकिरीच झालय … अंगाची काहिली होतेय … उष्णतेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळालेय … अशा वेळी समुद्रात , नदीत , तलावात , डुंबायला मिळालं  तर …! फक्त आठवणीनेच बरं वाटलं ना … आयुष्याचं  पण असच आहे … जेव्हा सर्व बाजूनी दु:ख , समस्या तुम्हाला घेराव घालतात … दु:खाचं रणरणत उन सुरु होतं …तेव्हा सुखाचे पावसाळे आठवायचे … मस्त सुखातील क्षण आठवायचे … आठवणींचा उपयोग यासाठीच  तर करायचा असतो …वाइट आठवणीना 'डिलीट ' मारून … चांगल्या क्षणांना 'स्पेस' द्यायचा असतो … ! असो … थोड्याच दिवसात मस्त पावसाला सुरुवात होईल अशी आशा  करू या …! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे
#संजीवनम्हात्रे #यालतरहसाल #सुपरस्पिकर #संजीवनमार्ग

Thursday, August 11, 2022

गट्टी - छोट्यांवरोबर

कार्यक्रम कुठे हि असू दे..कोणताही तालुका , जिल्हा... माझी लहानग्यांशी लगेच गट्टी जमते ..! banner वरअसलेल्या चेहऱ्याचा माणूस त्यांच्याशी बोलतोय याचे त्यांना खूप कुतूहल असते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद , विस्मय, आणि एक मस्त निरागसता असते.  ती मला मोहित करते. मी त्यांच्यात माझं बालपण शोधतो ..स्वत:ला त्यांच्यात बघतो..कदाचित  एक मोठा कलाकार त्यांच्यात दडलेलाअसेल..! पहिल्यांदा ते घाबरतात, बुजतात, आयोजक त्यांना ' ए पळा रे..इथून..असे म्हणत दूर करण्याचा प्रयत्न करतात..पण मी स्वतःच त्यांच्यात रमतो...हळूहळू  ती मुलं मस्त बिनधास्त होतात..शाळेतल्या कविता..सॉरी पोएम बोलतात...आणि याल तर हसाल च्या अगोदर मस्त एक छोटासा कवितांचा कार्यक्रम होतो...हळूच ते चेष्टा मस्करी करत गावातल्या बऱ्याच गोष्टी मला सांगतात.... सुचवितात..आणि मी कार्यक्रमाच्याअगोदर मस्त 'pure' होतो. त्यांची निरागसता आणि तरीही कुणालाही न दुखावणारा मिस्किलपणा खोडकर वृत्ती कार्यक्रमातआणण्याचा प्रयत्न करतो..!
.गुलजारसहजलिहूनजातात...
ए जिंदगी ..तू मेरा बचपन छीन सकती है...
..............मेरा बचपना नही....!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, December 16, 2021

डिसेंबर


नमस्कार ..!
डिसेंबर म्हटलं कि जरा Relax व्हायचं ....शांत होऊन जरा सरलेल्या वर्षाकडे पहायचं...काय चुकलं ..काय बरोबर ...याचं गणित मांडायचं ...आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी पुन्हा स्वप्नांची यादी गुंफायची ...वाईट मोडीत कडून चांगलं जोडीत जायचं ...आणि भूतकाळाला विसरत ...भविष्यकाळाला सजविण्यासाठी ...वतर्मानात जगायचं ....एवढं साधं सरळ ..आयुष्याचं गणित  ...अभ्यासक्रम तोच प्रत्त्येकाचा ...पण प्रश्नपत्रिका वेगळी सर्वांची ...कॉपी नाही करता येत आयुष्याच्या परीक्षेत ..म्हणून सामोरं जायचं सर्व सुख;दु:खाना  ......आणि तेच ...जरा RELAX राहायचं ...!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, March 14, 2021

दृष्टी


नमस्कार ..!! 
जीवनाचा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे, क्रूरतेकडून मानवते कडे , अभावातून संपन्नतेकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे आहे. जीवनाची हा दिशा आहे. आपलं जीवन उलगडून बघा...थोडं मागे वळुन... जर या विपरीत असा प्रवास सुरु असेल तर वाट चुकली आहे किंवा प्रवास सुरु आहे ही भ्रांत आहे . ..मागे वळून एकदा पाहायला काय हरकत आहे ..!! अनेक तेजस्वी किरणे घेऊन, आपल्या सौंदयाची उधळण करत , अनेक संधी , माणसं आपल्या बाजूला सतत  उभी करत , जीवनाची अनेक ध्येय तो आपल्यासमोर ठेवत असतो ...हे सर्व पाहण्याची, जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची दृष्टी नसेल तर सारं व्यर्थ ..!! म्हणून ही सम्यक दृष्टी विकसित करावी लागेल आणि त्यासाठी डोळे नाही तर मन:चक्षु उघडावे लागतील ..!! #थोडंअध्यात्मिक 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Sunday, September 20, 2020

बोलणं खुप महत्वाचं ..!!


नमस्कार ..!! 
बोलणं खुप महत्वाचं..! सध्याच्या रोजच्या परिस्थिती वर काय बोलणार ? सगळं काही बोलण्याच्या पलीकडचं सुरू आहे ...एका अनामिक भीतीच्या छायेखाली आपण वावरतोय ..!! 2019 मध्ये ही भीती नव्हती..की कुणीतरी दबा धरून बसलाय तो तुमचा जीव घेईल..!! बरं तो जीवघेणा आहे की नाही हे ही नक्की माहीत नाही ..तो जीव घेतोय की एका सिस्टिम ला आपण बळी पडतोय ..!! काय चाललंय कळत नाही...! यामुळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,मानसिक बदल घडताहेत ..या  सर्व बदलांना एकत्रितपणे सामोरे जाताना घुसमट होणे अनिवार्य आहे , स्वाभाविक आहे ..!! म्हणून व्यक्त व्हा,बोला ...ऐकून घेणार कुणी असेल तर फारच छान..!! प्रेशर कुकर सारखा 'सेफ्टी व्हॉल्व्ह' पाहिजे मनाला  ..!! ऐकून घेणार कुणी नसेल तर स्वतःशीच बोला, बोलता येत नसेल तर लिहा, कागदावर उतरवा...बघा..हलकं झालेलं मन भविष्याकडे बघत ...पॉझिटीव्ह विचारांचा मागोवा घेतं ..!! 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Thursday, June 11, 2020

चालत राहायचं ..!

चालत राहायचं ..सुख दुःखाची पळणारी झाडे दोन्ही बाजूनी पळत असतात...आभासी आहे ते सारं ..!! चालत राहणं हेच एकमेव सत्य ..अंतापर्यंत ..!! 
अंत हा अंत आहे की,...सुरुवात पुन्हा नव्याची ...हे ही माहीत नाही आपल्याला ..!! 
आत्मा अमर आहे हे सांगुन ठेवलंय आपल्याला ..!! जीवनाच्या वाटेवर शरीर समजतं...मग मन... कितीतरी जणांची आत्म्याशी गाठ पडतच नाही ..!! 
चालत राहूया...हसत हसत ..गाठ पडेलच कधी न कधी ..!! तोपर्यंत ...
तुम भी चलो, हम भी चले..चलती रहे ...जिंदगी ..!! 
  • संजीवन म्हात्रे ( मनातलं-006 ) 

Saturday, May 23, 2020

जगणं

जगणं कशाचं नाव आहे ? 
माहीत नाही ..
पैसे कमावण्याचं ? 
नाव कामावण्याचं ? 
सत्ता मिळवण्याचं ? 
प्रेम मिळवण्याचं ? 
काही कळत नाही ..एकालाच सगळं मिळत नाही ..प्रसिद्धी  आहे ..पैसा नाही ..
पैसा आहे..पण प्रेम नाही ...
सगळं एकदम नाही मिळत ..मग हा गेम चालु राहतो ..
हे मिळालं आता हे मिळवू या..आयुष्याच्या अंतापर्यंत..
माणसं पळतच असतात...मृगजळाच्या मागे..
आपण सामान्य ...
हे सगळं एखाद्यालाच मिळतं.. करोडोमधून एखाद्यलाच..
तो असामान्य ..
काळ हसत असतो...या सगळ्यावर ..
त्याची लाट येते...आणि रेतीवर  मेहनतीने मारलेल्या आयुष्याच्या  सर्व रेघोट्या पुसुन जाते... 
किनारा कोरा होऊन जातो ..
पुन्हा नवीन रेघोट्या मारण्यासाठी ...

- संजीवन म्हात्रे ( मनातलं -005 )