Saturday, July 20, 2024

गुरुपौर्णिमा ...!!

नमस्कार ...!
गुरुपौर्णिमा ...आपल्या गुरुंना वंदन करून त्यांच्याविषयी आदर , प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ..!  माझ्या सर्व गुरुंना मी आजच्या दिवशी वंदन करतो, त्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशातच आजपर्यंत मार्गक्रमण करत आहे. .!
गुरु हि संकल्पना आपल्या पौराणिक काळापासून चालत आलेली ..आपल्या हजारो पिढ्यांनी हि संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचविली . काळानुसार गुरु आणि शिष्य दोन्हीही बदलले. आदर आणि समर्पण हि भावना काळानुसार कमी कमी होत गेली. पूर्वी गुरु आणि शिष्यांमध्ये वयाचे खूप अंतर असायचे. त्यामुळे साहजिकच आदर असायचा, ज्ञान मिळविण्याचे एकमेव साधन म्हणजे गुरु असायचा. परंतु आता ...शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मित्रच बनू लागले. आणि त्यामुळे शिक्षक आणि शिष्य यामधील आदर कमी होऊ लागला.
                        पूर्वी गुरूबद्दल आदरयुक्त भीती असायची, आता मात्र भीतीयुक्त आदर शुल्लक राहिला आहे. सर्व शिक्षकांचे म्हणणे आहे कि आता मुलांना आमच्या बद्दल प्रेम ,आदर , जिव्हाळा वाटत नाही ...तसेच आजची पिढी सुद्धा पूर्वी सारखे गुरु शिक्षक आता राहिले नाहीत असेच म्हणते. दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत . टाळी एका हाताने थोडीच वाजते ...?
                      पण आज पुन्हा एकदा चांगल्या गुरूंची खूप गरज आहे. चांगली पिढी चांगले गुरूच घडवू शकतात. त्यासाठी आताच्या पिढीने पहिल्यांदा चांगले शिष्य होण्याची गरज आहे. चांगला शिष्यच पुढे चांगला गुरु होऊ शकतो. जो चांगला शिष्य नाही तो चांगला गुरु कसा होऊ शकेल..?
                   गुरु या शब्दाबद्दल सर्वाना आदर आहे. पण मग गुरु ची संकल्पना आपल्या मनात पूर्वी पासून अशी आहे ...दाढी वाढलेले, वयस्कर, सर्वस्वाचा त्याग केलेले , अशी व्यक्ती समोर येते ...असे दिसणारे गुरु आता नाहीत , पण खूप ज्ञान असणारे , अनेक नवनवीन क्षेत्रात पारंगत , EXPERTS अशी अनेक माणसे सामाजात आहेत. आताच्या काळातील सर्व विद्या त्यांना अवगत आहेत . तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्रातील निष्णात व्यक्ती तुमचा गुरु होऊ शकते. आधुनिक भाषेत त्यांना " MENTOR" म्हणू शकतो आपण . असो.
               आयुष्याला दिशा , योग्य मार्ग आणि अनुकूल गती प्रदान करणाऱ्या माणसाला मी गुरु मानतो. आणि एक गुरु असण्यापेक्षा अनेक गुरु असावेत. प्रत्येक कडून जे चांगला असेल ते घ्याव. " ग्रंथ हे आपले गुरु असे आपण मानतो' हे सत्यच आहे. आई वडील हे सुद्धा आपले प्रथम गुरूच असतात . आणि ज्या लोकांकडून आयुष्यात जे जे आपण शिकतो, ते सर्वच आपले गुरु असतात .
                 गुरु असल्याने आपला अहंकार नाहीसा होतो, माझ्या पेक्षा यांना जास्त माहिती आहे, मी यांच्याकडून शिकलो हे मान्य केलं कि अहंकार कसा राहील ? गुरूंची महिमा अगाध आहे. आपल्या सर्वाना आयुष्यात असेक अनेक योग्य, ज्ञानी,
गुरु मिळावेत आणि आपले आयुष्य समृद्ध व्हावे अशी मी आज परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
                                                                   हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Monday, January 8, 2024

AKKUA - आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन

सर्व उद्योजकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा 'मेसेज' खरं म्हणजे मला 1 जानेवारीलाच पाठवायचा होता, परंतु नवीन वर्षाच्या शुभेच्छा मध्ये हा मेसेज हरवून जाईल, म्हणून चार-पाच दिवस जाऊ दिले. आगरी कोळी कराडी उद्योजकांनी एकत्र येऊन व्यवसाय,उद्योगात प्रगती करावी, एकमेकांना मदत/सहकार्य करत व्यवसाय वृद्धी करावी, समाजातील पैसा समाजात रहावा.. यासाठी सर्व उद्योजकांनी एकत्र यावे, आपल्या समस्या एकोप्याने,  एकत्र येऊन सोडवाव्यात यासाठी AKKUA म्हणजेच आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन ची आपण सर्व मित्रमंडळींनी स्थापना केली. एकीचे बळ मिळते फळ ह्या उक्तीप्रमाणे, एकत्र आलो तर अनेक समस्या चुटकी सरशी सुटतील अशी सर्वांचीच आशा आहे. परंतु सर्वांना एकत्र कोण करणार ?  कोणत्या कारणासाठी सर्वजण एकत्र येणार? आणि मी या संघटनेत सामील झालो तर मला काय मिळणार ? माझ्या व्यवसायात कशी वाढ होणार ?  असे एक ना अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले असतील,  आणि त्यामुळेच आपला व्यवसाय भला आणि आपण भले ..! हा विचार घेऊन अनेक उद्योजक चालत राहतात. त्यामुळे उद्योजक हे सहसा समाज, संघटना, समाजकारण, राजकारण किंवा अशा प्रकारात ते उत्साह दाखवत नाहीत,आणि त्यामुळे संघटना स्थापन होऊन दोन वर्षात आपण व्हाट्सअप ग्रुप वरील 350 सदस्य ते सुद्धा Reference ने मिळालेले इथपर्यंत मजल मारली..! 350 लोकांचा व्हाट्सअप ग्रुप वर जाहिरात करून एखादं काम मिळालं तर उत्तम किंवा रेफरन्स साठी असले ग्रुप पाहिजे असतातच,  त्यातलाच एक ग्रुप म्हणून अनेकांनी याकडे पाहिले सुद्धा असेल. अर्थात संघटना म्हणून काही ठोस करायला आपल्याला जमलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही..!  आणि म्हणून हे जमणार च नाही असेही नाही ..! आपण व्यावसायिक आहोत, सुरुवातीला अपयश येतच ..ती यशाची पहिली पायरी आहे..!  त्यामुळे टिकून राहणे हे खूप महत्त्वाचा असतं. आणि कसल्याही परिस्थितीत संघटना दोन वर्षे टिकून ठेवली ..याच श्रेयही आपल्या सर्वांनाच ..!! 
2024 हे वर्ष प्रचंड उलथा पालथी चे वर्ष असणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका या वर्षात होतील राजकारणाने हा देश ढवळून निघेल राजकारण हा एकमेव व्यवसाय आहे की काय अशी परिस्थिती होईल अनेक व्यवसाय निर्माण होतील,  काही नष्ट ही होतील. अनेक नवीन संधी निर्माण होतील.  काळाच्या ओघात हे सुरूच राहणार ..! 2024 याला अपवाद असणार नाही. परंतु या गदारोळात एकटा व्यवसायिक टिकेल की नाही ही शंकाच आहे. त्यामुळे  संकटांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हावे लागेल,  छोट्या मोठ्या अनेक व्यवसायिकांची, उद्योजकांची मोट बांधावी लागेल. आपण हे करण्यात यशस्वी झालो, तर सर्वांचंच भलं होईल,सर्वांनाच त्याची फळ मिळतील..!  आणि नाही झालो,  तर प्रत्येकाच आपल  स्वतंत्र आयुष्य आहेच. जगऱहाटी सुरूच राहते त्याप्रमाणे सर्व काही आहे तसेच चालत राहील. परंतु आपण उद्योग व्यवसायात यशस्वी झालो, आर्थिक स्वातंत्र्य आलं, तर आपल्याला बघून चार जण अजून उद्योग धंद्यात आले, समाजात एक उद्योग चळवळ सुरू करण्याचे श्रेय आपल्याला मिळालं,  संपूर्ण समाजा मध्ये आर्थिक साक्षरता आली तर चित्र बरचसं बदलेल..! आणि हो, केंद्र आणि राज्य शासनाच्या अगणित योजना उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी आहेत पण आपण त्याची माहिती घेणं तर सोडाच कधी त्यांचा फायदा घेण्याचा विचारही करत नाही याउलट कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात मात्र त्यांचा भलाभक्कम फायदा त्या त्या भागातली लोकं करून घेतांना दिसतात !म्हणून मित्र हो, थोडा वेळ काढा आणि AKKUA  मध्ये सामील व्हा ..! आपण सर्वजण बिझी आहेत,  आम्ही सुद्धा..!  परंतु जर आपण संघटितपणे, एकत्र येऊन, एकमेकांना मदत करत प्रत्येकाचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली तर यासारखे दुसरा आनंद नाही ..! पुढे अजून व्यवसाय बद्दल लिहीतच जाईन..!  हा लेख फक्त AKKUA साठी लिहिला..! सर्वांना एकच विनंती उद्योगाची कास धरा..!  आर्थिक स्वतंत्र व्हा..!  आणि AKKUA मध्ये सामील व्हा..!  धन्यवाद ..!

Thursday, August 3, 2023

पैसा आणि आनंद

पैसा मिळवण्याच्या नादात, माणसं मिळवायचे राहूनच जातं..!  पैशबरोबर माणसं ही जोडत जायचं..कारण हीच मिळवलेली माणसं तुम्हाला पैशाने विकत घेता येणार नाही अशी काही गोष्टी मिळवून देतात..!  शेवटी आयुष्य तुम्ही कोणत्या फूटपट्टीने मोजता, यावर सर्व काही अवलंबून आहे. ती फुटपट्टी पैसा आहे की आनंद ..? पैसा ...दाखवता येतो, मिरवता येतो... आनंद मात्र असं काही करत नाही..!  पैसा बाह्य आहे आणि आनंद ही आतली गोष्ट आहे..!  पैसा उपभोगाची वस्तू आहे तर आनंदही अनुभवाची भावना आहे ..! Finally , पैशातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही भ्रमात आहात .! पैशातुन फक्त सुख मिळत, आनंद नाही..!  पैसा एका क्षणाला निरोपयोगी आणि बोथट होऊन जातो..! जिथून पैशाचं काम संपत ..आनंद तिथून सुरु होतो..!! 
- संजीवन म्हात्रे. 
थोडं जनातलं थोडं मनातलं 

Thursday, May 18, 2023

थोडं मनातलं -001

नमस्कार ! 
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु आहे … उन 'मी ' म्हणतंय … सकाळी १० वाजल्यानंतर बाहेर जाणं जिकिरीच झालय … अंगाची काहिली होतेय … उष्णतेने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळालेय … अशा वेळी समुद्रात , नदीत , तलावात , डुंबायला मिळालं  तर …! फक्त आठवणीनेच बरं वाटलं ना … आयुष्याचं  पण असच आहे … जेव्हा सर्व बाजूनी दु:ख , समस्या तुम्हाला घेराव घालतात … दु:खाचं रणरणत उन सुरु होतं …तेव्हा सुखाचे पावसाळे आठवायचे … मस्त सुखातील क्षण आठवायचे … आठवणींचा उपयोग यासाठीच  तर करायचा असतो …वाइट आठवणीना 'डिलीट ' मारून … चांगल्या क्षणांना 'स्पेस' द्यायचा असतो … ! असो … थोड्याच दिवसात मस्त पावसाला सुरुवात होईल अशी आशा  करू या …! 
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे
#संजीवनम्हात्रे #यालतरहसाल #सुपरस्पिकर #संजीवनमार्ग

Thursday, August 11, 2022

गट्टी - छोट्यांवरोबर

कार्यक्रम कुठे हि असू दे..कोणताही तालुका , जिल्हा... माझी लहानग्यांशी लगेच गट्टी जमते ..! banner वरअसलेल्या चेहऱ्याचा माणूस त्यांच्याशी बोलतोय याचे त्यांना खूप कुतूहल असते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद , विस्मय, आणि एक मस्त निरागसता असते.  ती मला मोहित करते. मी त्यांच्यात माझं बालपण शोधतो ..स्वत:ला त्यांच्यात बघतो..कदाचित  एक मोठा कलाकार त्यांच्यात दडलेलाअसेल..! पहिल्यांदा ते घाबरतात, बुजतात, आयोजक त्यांना ' ए पळा रे..इथून..असे म्हणत दूर करण्याचा प्रयत्न करतात..पण मी स्वतःच त्यांच्यात रमतो...हळूहळू  ती मुलं मस्त बिनधास्त होतात..शाळेतल्या कविता..सॉरी पोएम बोलतात...आणि याल तर हसाल च्या अगोदर मस्त एक छोटासा कवितांचा कार्यक्रम होतो...हळूच ते चेष्टा मस्करी करत गावातल्या बऱ्याच गोष्टी मला सांगतात.... सुचवितात..आणि मी कार्यक्रमाच्याअगोदर मस्त 'pure' होतो. त्यांची निरागसता आणि तरीही कुणालाही न दुखावणारा मिस्किलपणा खोडकर वृत्ती कार्यक्रमातआणण्याचा प्रयत्न करतो..!
.गुलजारसहजलिहूनजातात...
ए जिंदगी ..तू मेरा बचपन छीन सकती है...
..............मेरा बचपना नही....!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Thursday, December 16, 2021

डिसेंबर


नमस्कार ..!
डिसेंबर म्हटलं कि जरा Relax व्हायचं ....शांत होऊन जरा सरलेल्या वर्षाकडे पहायचं...काय चुकलं ..काय बरोबर ...याचं गणित मांडायचं ...आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी पुन्हा स्वप्नांची यादी गुंफायची ...वाईट मोडीत कडून चांगलं जोडीत जायचं ...आणि भूतकाळाला विसरत ...भविष्यकाळाला सजविण्यासाठी ...वतर्मानात जगायचं ....एवढं साधं सरळ ..आयुष्याचं गणित  ...अभ्यासक्रम तोच प्रत्त्येकाचा ...पण प्रश्नपत्रिका वेगळी सर्वांची ...कॉपी नाही करता येत आयुष्याच्या परीक्षेत ..म्हणून सामोरं जायचं सर्व सुख;दु:खाना  ......आणि तेच ...जरा RELAX राहायचं ...!!!
आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे.

Sunday, March 14, 2021

दृष्टी


नमस्कार ..!! 
जीवनाचा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे, क्रूरतेकडून मानवते कडे , अभावातून संपन्नतेकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे आहे. जीवनाची हा दिशा आहे. आपलं जीवन उलगडून बघा...थोडं मागे वळुन... जर या विपरीत असा प्रवास सुरु असेल तर वाट चुकली आहे किंवा प्रवास सुरु आहे ही भ्रांत आहे . ..मागे वळून एकदा पाहायला काय हरकत आहे ..!! अनेक तेजस्वी किरणे घेऊन, आपल्या सौंदयाची उधळण करत , अनेक संधी , माणसं आपल्या बाजूला सतत  उभी करत , जीवनाची अनेक ध्येय तो आपल्यासमोर ठेवत असतो ...हे सर्व पाहण्याची, जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची दृष्टी नसेल तर सारं व्यर्थ ..!! म्हणून ही सम्यक दृष्टी विकसित करावी लागेल आणि त्यासाठी डोळे नाही तर मन:चक्षु उघडावे लागतील ..!! #थोडंअध्यात्मिक 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे