Wednesday, December 6, 2017

मेरे पास माँ है ...! - शशी कपूर ,


मेरे पास माँ है ...!
कुणी कलाकार गेला कि मनाला वेदना होतात ... खरं  म्हणजे कलाकार कधीही मरत नसतात ते रसिकांच्या मनात अमर होत असतात..! परवा शशी कपूर गेल्यानंतर असंच काहीतरी वाटलं ... दिवसभर मनाला चुटपुट लागून राहिली ... काहीतरी हरविल्यासारखं वाटलं .... खूप विचार केल्यानंतर याचा उघड झाला ...!
                     मागे विनोद खन्ना गेल्यानंतर असाच काहीतरी लिहावंसं वाटलं होतं ... आणि लिहिलंही होतं  आजही तसंच झालं ..!  कारण अमिताभ बच्चन , शशी कपूर , विनोद खन्ना, शत्रुघन सिन्हा , विनोद मेहरा ...या कलाकारांनी आमचं बालपण सुखकर केलं ..! सिनेमा मधून जे संस्कार झाले ते मनावर कायमचे कोरले गेले . ( पूर्वी सिनेमा मधून सुद्धा उत्तम संस्कार होऊ शकत असत ..! )  आई , वडील , मोठा भाऊ , लहान भाऊ , गुरु , बुजुर्ग , समाजामध्ये कसं वागावं हे चित्रपटातील हिरो च्या वागण्यावरून आम्ही शिकलो. शशी कपूर हा सुद्धा अतिशय उमदा , देखणा आणि कोणत्याही  'कॅरॅक्टर' मध्ये शोभणारा कलावंत ...!
                अमिताभ चा जमाना असताना, सगळ्या भूमिका अमिताभ यांच्या साठी लिहिल्या जात असताना , त्या काळात आपला स्वतंत्र ठसा उमटविणे इ खुप मोठी गोष्ट होती ..! दिवार  मधला प्रसंग ...दोन भावांमधील द्वंद्व... अमिताभ ला सही मागणारा इन्स्पेक्टर भाऊ ... अमिताभचे चे जबरदस्त ' जाव पहले ऊस आदमी का साईन  लेकरं आव ... असे जबरदस्त डायलॉग ...नंतर मेरे पास ..गाडी है , बंगला  है ...असा म्हणत...  क्या है तुम्हारे पास ? असा सर्वांची बोलती बंद करणारा सवाल ...भावनांचा कल्लोळ उभा करणारं  दृश्य ......अशा वेळी शशी कपूर यांनी चारच  शब्दांत हि लढत जिंकली ...मेरे पस माँ है ...! मुद्राभिनयाचा जबरदस्त अविष्कार शशी कपूर यांनी पेश केला आणि या एका डायलॉग ने अख्खी पिढी संस्कारित केली ..!
चार दशकानंतर सुद्धा.."  मेरे पास  माँ है .."! ह्या एका वाक्याचा प्रभाव आजही कायम आहे. याचं  क्रेडिट जसं सलीम - जावेद यांच्या लेखणीला तसाच शशी कपूर यांच्या उत्कट अभिनयाला सुद्धा ..! अमिताभ समोर काम करायला त्या काली कलाकार कचरत असताना शशी कपूर मात्र अमिताभ बरोबर अनेक यशस्वी चित्रपटात ठामपणे उभे राहिले . दिवार , कभी कभी , शान, इमान धरम , काला  पत्थर , त्रिशूल, सुहाग, नमक हलाल, सिलसिला असे अनेक चित्रपट सांगता येतील .
                अवखळ नाचणारा नायक ते धीर गंभीर पोलीस अधिकारी अशा शेकडो व्यक्तिरेखा शशी कपूर यांनी सहज साकारल्या. त्या काळातल्या नंदा , हेमामालिनी, रेखा, शर्मिला टॅगोर , मौशमी चॅटर्जी , झीनत , परवीन बाबी अशा अनेक दिग्गज नायिकांबरोबर पडद्यावर त्यांची जोडी जमली. आम्ही तारुण्यातआल्यानंतर शशी कपूर यांचा अभिनय समजायला लागला. निर्माता म्हणून काही त्यांनी चाकोरीबाहेरचे चित्रपट दिले . उत्सव , विजेता , ३६ चौरंगी लेन या चित्रपटांनी शशी कपूर यांची वेगळी ओळख रसिकांना दिली. पुढे तर ...अमेरिका आणि ब्रिटिश चित्रपटात काम करणारा पहिला भारतीय कलाकार म्हणून हि शशी कपूर  यांची ओळख होती .
                   मी व्यावसायिक नाट्यक्षेत्रात आल्यानंतर शशी कपूर यांची वेगळी ओळख समजली. व्यवसायिक चित्रपटातला हा यशस्वी कलाकार, नाट्यक्षेत्र पुढे येण्यासाठी धडपड करत होता. संपूर्ण हयात नाटकाचे दौरे करत घालविणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचं 'हक्काचं  नाट्यगृह हवं " हे स्वप्न ह्या बेट्याने पूर्ण करत नाटकासाठी 'पृथ्वी थियेटर'  उभं केलं. आपल्या मालकीच्या नाट्यगृहात सुद्धा तिकीट काढून येणार हा अवलिया नाट्यसंस्कृतीच एक जबरदस्त वारसा देऊन गेलाय ...!
                                  २०१५ मध्ये दादासाहेब फाळके, २०११ मध्ये पदमभूषण , आणि २०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळविणारा हा कलाकार ...आजच्या नवीन पिढीसाठी एक नायक , कलाकार निर्माता आणि त्याहूनही जास्त एक माणूस म्हणून आदर्श ठरावा ...!

मेरे पास माँ है ...हे म्हणताच
         तू डोळ्यासमोर येत राहशील ,
येणाऱ्या अनेक पिढयांना
एक नवा आदर्श देत राहशील ...!

तुझा चाहता - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे