Sunday, September 20, 2020

बोलणं खुप महत्वाचं ..!!


नमस्कार ..!! 
बोलणं खुप महत्वाचं..! सध्याच्या रोजच्या परिस्थिती वर काय बोलणार ? सगळं काही बोलण्याच्या पलीकडचं सुरू आहे ...एका अनामिक भीतीच्या छायेखाली आपण वावरतोय ..!! 2019 मध्ये ही भीती नव्हती..की कुणीतरी दबा धरून बसलाय तो तुमचा जीव घेईल..!! बरं तो जीवघेणा आहे की नाही हे ही नक्की माहीत नाही ..तो जीव घेतोय की एका सिस्टिम ला आपण बळी पडतोय ..!! काय चाललंय कळत नाही...! यामुळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,मानसिक बदल घडताहेत ..या  सर्व बदलांना एकत्रितपणे सामोरे जाताना घुसमट होणे अनिवार्य आहे , स्वाभाविक आहे ..!! म्हणून व्यक्त व्हा,बोला ...ऐकून घेणार कुणी असेल तर फारच छान..!! प्रेशर कुकर सारखा 'सेफ्टी व्हॉल्व्ह' पाहिजे मनाला  ..!! ऐकून घेणार कुणी नसेल तर स्वतःशीच बोला, बोलता येत नसेल तर लिहा, कागदावर उतरवा...बघा..हलकं झालेलं मन भविष्याकडे बघत ...पॉझिटीव्ह विचारांचा मागोवा घेतं ..!! 
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Thursday, June 11, 2020

चालत राहायचं ..!

चालत राहायचं ..सुख दुःखाची पळणारी झाडे दोन्ही बाजूनी पळत असतात...आभासी आहे ते सारं ..!! चालत राहणं हेच एकमेव सत्य ..अंतापर्यंत ..!! 
अंत हा अंत आहे की,...सुरुवात पुन्हा नव्याची ...हे ही माहीत नाही आपल्याला ..!! 
आत्मा अमर आहे हे सांगुन ठेवलंय आपल्याला ..!! जीवनाच्या वाटेवर शरीर समजतं...मग मन... कितीतरी जणांची आत्म्याशी गाठ पडतच नाही ..!! 
चालत राहूया...हसत हसत ..गाठ पडेलच कधी न कधी ..!! तोपर्यंत ...
तुम भी चलो, हम भी चले..चलती रहे ...जिंदगी ..!! 
  • संजीवन म्हात्रे ( मनातलं-006 ) 

Saturday, May 23, 2020

जगणं

जगणं कशाचं नाव आहे ? 
माहीत नाही ..
पैसे कमावण्याचं ? 
नाव कामावण्याचं ? 
सत्ता मिळवण्याचं ? 
प्रेम मिळवण्याचं ? 
काही कळत नाही ..एकालाच सगळं मिळत नाही ..प्रसिद्धी  आहे ..पैसा नाही ..
पैसा आहे..पण प्रेम नाही ...
सगळं एकदम नाही मिळत ..मग हा गेम चालु राहतो ..
हे मिळालं आता हे मिळवू या..आयुष्याच्या अंतापर्यंत..
माणसं पळतच असतात...मृगजळाच्या मागे..
आपण सामान्य ...
हे सगळं एखाद्यालाच मिळतं.. करोडोमधून एखाद्यलाच..
तो असामान्य ..
काळ हसत असतो...या सगळ्यावर ..
त्याची लाट येते...आणि रेतीवर  मेहनतीने मारलेल्या आयुष्याच्या  सर्व रेघोट्या पुसुन जाते... 
किनारा कोरा होऊन जातो ..
पुन्हा नवीन रेघोट्या मारण्यासाठी ...

- संजीवन म्हात्रे ( मनातलं -005 ) 

Wednesday, May 20, 2020

लॉकडाउन -04 ( मनातलं -004 )

नमस्कार ..!! 
लॉकडाऊन-4 सुरू आहे. पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे.  मे महिन्याच्या शेवटी नेहमी पाऊस, वादळ घेऊन ढगांची दाटी व्हायची.. पण यावर्षी मात्र आपण जागतिक मंदी, बेकारी आणि महामारी च्या  छायेत वावरत आहोत.. !  असो, हे सर्वांनाच माहिती आहे.  काळ कठीण आहे. अगोदरच दोन महिन्यांचा संघर्ष आपण केलाच आहे.  कदाचित हे आणखी काही दिवस किंवा महिने चालेल, पण प्रत्येक रात्री ला पहाट जोडलेली असते तसे या संकटातून आपण जरूर बाहेर पडू ..!! हळूहळू  सावरू आणि पहिल्यासारखे वावरु ..!! तोपर्यंत ...
घरातच वावरा आणि 
स्वतःला सावरा...!! ( #मनातलं ) 
- संजीवन म्हात्रे

Sunday, May 10, 2020

श्री राम...!

               राम ..! आदर्श जीवन,आदर्श राजा, आदर्श भाऊ, आदर्श मुलगा, आदर्श पती ....असे सर्व आदर्श ..यांची प्रतिकृती म्हणजेच राम ..! राम हा शब्द उलटा केला तर ' मरा' होतो.  याचा अर्थ 'राम' म्हणजेच जीवन..!! संपूर्ण जीवनभर आपण 'राम' होण्याचा म्हणजेच चांगलं किंवा आदर्श होण्याचा विचार करतो,  राम होण्यासाठी च जगतो. आपण आपल्यातले दुर्गुण कमी करून पूर्णत्वाकडे जाण्याचा  प्रयत्न करतो आयुष्यभर ..!! पूर्णत्वाचा आदर्श आपल्या संस्कृतीने आपल्या समोर ठेवला आहे - 'राम' ..!! एखाद्याच्या जीवनात काहीही उरले नसेल तर, आपण त्यात काही 'राम' उरला नाही असे म्हणतो.  'राम' याचा अर्थ जीवनाचे सार,जीवनाचे मर्म , आणि जीवनाचा अर्थ...!!  एकमेकांना भेटलो तरी अभिवादन करताना आपण 'राम राम' म्हणतो.  त्याचा अर्थ आपल्याला क्षणोक्षणी 'राम' स्मरावा ...यासाठी हा खटाटोप..!!  राम नामाने आदर्श जीवनाचे स्मरण करणे, आणि मेल्यावर सुद्धा 'राम नाम सत्य आहे' असं म्हणतात आपण जगाचा निरोप घेतो महात्मा गांधींनी सुद्धा शेवटच 'हे राम'  हे शब्द उच्चारले होते.
                  रामायण आपल्याला सर्वांनाच माहित  आहे. प्रभु रामचंद्रांना आपण ईश्वर मानतो. मानव रूपातील हा विष्णूचा अवतार ! एखाद्या मनुष्याप्रमाणेच त्यांना सर्व कर्तव्ये पार पाडावी लागली. रामायणाने आपल्यालाच नव्हे, भारतभूमीलाच नव्हे तर संपूर्ण जगताला ' मानवी जीवन कसे जगावे ' याचा एक आदर्श घालुन दिला आहे . राम जोपर्यंत  अयोध्येत होते, तोपर्यंत 'राजपुत्र राम', 'श्रीराम' म्हणून त्यांचा उल्लेख आहे.  परंतु चौदा वर्षांचा वनवासानंतर आणि रावणाचा वध करून आल्यानंतर, राम हे 'मर्यादा पुरुषोत्तम' आणि  'भगवान राम' म्हणून ओळखले जाऊ लागले.  कल्पना करा, त्यांचा  राज्याभिषेक होणार होता आणि अचानक त्यांना 14 वर्ष सपत्नीक वनवासात जावे लागले,  आपण किती आकांडतांडव केला असता, परंतु राज्याभिषेक होणार होता म्हणून ते आनंदी नव्हते आणि वनवासात जावे लागले म्हणून ते दुःखी नव्हते.  आलेल्या प्रत्येक गोष्टीला ते अत्यंत स्वीकार भावनेने सामोरे गेले.  आणि चौदा वर्षांचा खडतर वनवास भोगून, रावणाशी युद्ध लढून आणि जिंकून 'भगवान राम'  म्हणून परत आले...!!
                      प्रभू रामचंद्र यांच्या वर संकटावर संकटे कोसळली. 14 वर्षे वनवास,  पित्याचा मृत्यू, पत्नीचे अपहरण, लक्ष्मणाला आलेली मुर्च्छा, रावणाबरोबर घनघोर युद्ध.... अनेक प्रसंग राम या शब्दाची कसोटी पाहतात. मला काही वैशिष्ट्ये जरूर नमूद करावीशी वाटतात.  रावणाबरोबर लढण्यासाठी  बलशाली  वाली ला सोबत न घेता,  सुग्रीव  ला सोबत घेतले. वाली इतका बलाढ्य होता की त्याने रावणाला पराभूत केले होते.  तो इतका बलशाली होता की एखाद्या 'वाली' नाही म्हणजेच आधार नाही हा वाक्प्रचार वाली चे महत्व सांगून जातो.  परंतु वाली ने स्वतःच्या भावाच्या पत्नीचे अपहरण  केले, म्हणून प्रभू रामचंद्र यांनी वाली चा वध केला. बलाढ्य  परंतु असत्य असणाऱ्या वालीची बाजू न घेता सत्य असणाऱ्या सुग्रीवाची बाजू घेतली. सत्याच्या सोबत  राहायला ताकद लागते.  हनुमंत, जांबुवंत, सुग्रीव, नल, निल, अंगद असे अनेक जबरदस्त योद्धे  निर्माण करून त्यांच्यात नेतृत्वागुण विकसित केले.  रावणाकडे जबरदस्त ताकत महान योद्धे, सक्षम राक्षसी  सेना असे सर्व होते. परंतु सत्य कधीही ही पराभूत होत नाही.  'सत्यमेव जयते' हे ब्रीद वाक्य आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण जीवनचरित्रातून मिळते.  कोणत्याही प्रसंगात धीरगंभीर, स्मितहास्य करीत सामोरे जाणाऱ्या प्रभु रामचंद्र, प्रचंड पराक्रमी, निश्चयाचा,कर्तव्याचा परमोच्च बिंदू च आहेत ..!! राम राजा असून सुद्धा शबरीची उष्टी बोरे खातात, केवटला जवळ करतात, सुग्रीवाला राज्य मिळवून देतात आणि रावणाचा वध सुद्धा करतात...!!  म्हणूनच 'मर्यादा पुरुषोत्तम', 'भगवान राम' असा  आदर्श भारतीय संस्कृतीचा वारसा आपण सांगतो.  कठीण प्रसंगात अत्यंत शांत राहणाऱ्या प्रभू रामचंद्र, उत्कृष्ट सेनानी, महापराक्रमी राजा, दयाळू ,शांत असे हजारो-लाखो गुण रामायणातील एकेक प्रसंगांवर आपल्याला सांगता येतात. 
         लहानपणी आईनं सांगितलं होतं की भुताची भीती वाटली तर 'राम राम'  म्हणायचं ....भुतं पळून जातात इतका राम आपल्या आयुष्यात आहे, नव्हे  तो तर आमच्या जीवनाचा आधार आहे ...!! 
जय श्रीराम !!!
  • संजीवन म्हात्रे 

Friday, May 1, 2020

वाद्य ..!

मनातलं !! ,
एका बाजूनी वाजणारी ही वाद्य काळाच्या पाडद्याआड गेलीत ...किंवा त्यांचा उपयोग फार नाही राहिला..! सतत एकच आवाज करणारी वाद्य वेडी ठरलीत ..!! उलट कल ओळखून दोन्ही बाजूनी वाजण.. आज समझदारीचं , बुद्धिमत्तेच लक्षण झालंय..!! ज्यांना हे जमत नसेल अशा वाद्यांना कुठेही थारा नाही ..!! वाद्य कशी पाहिजेत आज...? एकातच सगळ वाजलं पाहिजे, आवाज बदलता आले पाहिजेत, काळ ओळखुन पट्टी बदलता आली पाहिजे आणि हो सर्वात महत्वाचं ...कधी कधी वाजण्याची क्षमता असून गप्प बसता आलं पाहिजे..! अशी वाद्य एकमेकांना धरून वाजत राहतात वाद्यवृंदात ..त्यांचा स्वतःचा आवाज  वाद्यवृंदात निरर्थक आहे  हे त्यांना ही माहीत असत... तरीसुद्धा...!  
 - संजीवन म्हात्रे ( मनातलं -004 ) 

Friday, April 24, 2020

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सचिन..!! 💐

सचिन, 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! 
स्वप्न  बघावं ...जगावं आणि कसं पूर्ण करावं हे फक्त तुझ्याकडून शिकावं ..!! आमची एक पिढी तुझी शतकं मोजतच मोठी झाली ..!! 20 वर्षांच्या अथक मेहनतीने , तू  शतकांचं शतक करून, भारताला वर्ल्ड कप देऊन क्रिकेटला अलविदा केलंस..!! परंतु आमच्या हृदयातून तू अलविदा होऊ शकत नाहीस ..!! शोएब ला पॉईंट च्या डोक्यावरून मारलेला षटकार 'मोमेंट ऑफ द वर्ल्ड कप'  होता ..पण आमच्यासाठी असे लाखो आनंदाचे क्षण तू दिलेस ..!! जगातल्या अनेक महारथी गोलंदाजांना तू मैदानात फोडून काढायचास तेव्हा आम्हाला असं वाटायचं जणू आम्हीच मैदानावर जाऊन त्यांना फटकावतोय..!! किती लिहावं..तू भारतरत्न आहेस ..आणि क्रिकेतरसिकांनी तर तुला क्रिकेटच्या मैदानावरील देवत्व बहाल केलयं ..!! 
- संजीवन म्हात्रे 

Thursday, April 23, 2020

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने


नमस्कार ..!!
जागतिक पुस्तक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा !!
समृद्ध व्हायचं असेल तर पुस्तके वाचल्याशिवाय पर्याय नाही..!! वाचता येईल, त्याला स्वतःला आणि दुसऱ्याला वाचवता पण येईल ..!! रोज कमीत कमी 5 पाने वाचायची सवय लावा, आपली वैचारिक, मानसिक,  अध्यात्मिक शक्ती वाढल्यासारखी वाटेल ..!! चांगली पुस्तकं निवडा, ती वाचा ,आपल्या मुलांना आणि सर्वानाच पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करा ..!! जग बदलेल ..कारण हे सामर्थ्य फक्त पुस्तकात आहे ..!! ( #मनातलं-002)
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे
#संजीवनम्हात्रे #sanjeevanmhatre #मनातलं #sm

Sunday, April 5, 2020

कोरोनाच्या निमित्ताने

रक्तबंबाळ देश माझा, आणि सार जग
तरी ही धर्म पेटवणारे शहाणे किती ? 

राजकारण करा , आधी जाऊ द्या कोरोना
मग मोजा मतदारसंघात मकाने किती ? 

कुठून घुसला देशात, हा जीवघेणा विषाणू  
देशद्रोह्यांचे अजूनही, ठिकाने किती ? 

कोरोना, तू  फाडलास बुरखा टरारा
भजती देशाला तनाने किती , मनाने किती ? 

संयम ठेवा आणि द्या धीर एकमेकांना 
वाचाळवीरांचे इथे ठणाने किती ? 

किती आले आणि किती गेले सिकंदर परत
जरी देशांवर जाहिलांचे , निशाणे किती ? 

तू लढ शांतपणे, हे तुझे कर्तव्य प्रथम 
तुला बोलण्याचे त्यांचे बहाणे  किती ? 
  • संजीवन म्हात्रे - 4 एप्रिल 2020

Wednesday, April 1, 2020

कोरोना विरुद्ध जिंकायचंय...!!

मार्च महिना संपला..!  गेले पंधरा दिवस घरीच  बसलोय. मीच काय, सारे जग सुद्धा घरात बसून आहे. ' लॉक डाऊन' हा शब्द दोन महिन्यापूर्वी कुणाला माहितीदेखील नसेल. आता दिवस-रात्र हाच विषय अखिल मानव जातीमध्ये बोलला जातोय. प्रचंड वेगाने धावणाऱ्या मानवाच्या वेगाला खिळ बसलीय. अचानक धावणाऱ्या ट्रेनला, कुणीतरी साखळी ओढावी आणि ती ट्रेन रस्त्यातच थांबावी, अशी मानवाची गत झालीय.  जीवनाचा वेग पूर्णपणे मंदावला,  नाही तर तो पूर्णपणे थंडावला आहे..! आणि हे मानवजातीला सहन होत नाही आहे. एक  विषाणू ने जगभर थैमान घातले आहे. मानव आता  स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढतोय. आता सर्वांचा शत्रू एकच आहे. हे  अमेरिका - चीन, इराण-इराक, भारत - पाकिस्तान असे युद्ध नाही. हे नॉर्डीक - ज्यु,  हिंदू-मुस्लीम,असा धार्मिक, वांशिक , जातीय , सीमावाद, भाषिक वाद , असा  कसलाही मानवी संघर्ष नाही . एका बाजूला सात अब्ज मानव आपला आत्तापर्यंत विकसित झालेलं संपूर्ण प्रगत विज्ञान घेऊन उभे आहे  तर विरुद्ध बाजूला आहे डोळ्यांनाही न दिसणारा क्षुद्र विषाणू ..!! - कोरोना ..!! 
                       शत्रु न  दिसणारा, क्षुद्र  वाटणारा असल्यामुळे,  माणूस गोंधळात सापडलाय.  कसं लढावं ~ कुणाशी लढाव ? कधी लढावं ? आणि का लढावे हे देखील त्याला अजून पूर्णपणे कळालेलं नाही. त्याला निष्क्रिय 'घरात फक्त थांब' आपण हे युद्ध जिंकू हेच समजत नाही. कारण शत्रूला अजून त्याने पूर्णपणे ओळखून घेतलेला नाही,  समजून घेतलेलं नाही. परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर मानवजात विनाशाच्या जवळ जाऊ शकते आणि तरीही  आपण अजूनही 'उद्यासाठी भाजी मिळणार की नाही'?  या विवंचनेत आहोत.आम्ही एकत्र जमणार, नमाज पढणार अशा दरपोक्ती फोडत आहोत .माझ्या  मते देश हाच  सर्वात मोठा देव आणी देशभक्ती हीच  सर्वात महत्त्वपूर्ण भक्ती..!  मी स्वतः अत्यंत आस्तिक आहे. परंतु आज आवश्यकता आहे, मानवाच्या प्रचंड संयमाची, निर्धाराची आणि आत्मशक्तीची ..!! 
                          हा लढा जिंकणे  अशक्य नाही..!  आपण जिंकू ..!  पणे  हे सर्व सहज होईल हे मात्र विसरून जा.   कोरोनाने जग आर्थिक मंदीच्या लाटेवर आणून सोडले आहे . त्यामुळे पुढे आर्थिक संघर्ष उभा राहील. म्हणुन  माणसाने आता माणसासारखे वागून माणुसकी हाच केवळ धर्म मानावा लागेल.  अनेक समाजोपयोगी काम करणारे निस्वार्थी मानवी हात, संघटना पुढे याव्या लागतील.  पोलीस वैद्यकीय यंत्रणांना मजबूत करावे लागतील. अंदाधुंदी, अराजक माजणार नाही अशी व्यवस्था ठेवावी लागेल. चोख  कायद्याचे राज्य निर्माण केले आहे, ते शाश्वत करण्यासाठी शासनाला आणि शासकीय यंत्रणांना मजबूत करावे लागेल.  शासनाला कोणतीही कठोर निर्णय देशाच्या आणि मानवजातीच्या भल्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी घ्यावे लागतील.  आणि त्याची निर्दयपणे अंमलबजावणी करावी लागेल. 
              मी एकही दिवस घरी न थांबणारा, सतत काम करणारा,  स्वतःला बिझी म्हणून धन्यता मानणारा, सतत भ्रमण करणारा...परंतु आज शांत घरी बसलोय ..!! मी मानव संहाराच्या दैत्याची  पावलं ओळखलीत ..! मी स्वतःला निक्षून सांगितले आहे, स्वयंशिस्तीने मी याचा मुकाबला करेन..!  कारण मला जगायच आहे आणि माझ्या कुटुंबियांना , नातेवाईकांना, समाजाला आणि संपूर्ण देशाला सुखरूप बघायच आहे.  पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आदर्श असे संस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव मला बघायाचे आहेत. मला माझा देश समृद्ध बघायचा आहे.  आणि म्हणूनच मी सध्या मला घरात कोंडून घेतले आहे .आणि सर्वच विनंती करतो ह्या शत्रूला पूर्णपणे समजून घ्या म्हणजे त्याचा नीट मुकाबला करता येईल आणि त्याला परास्त करता येईल..! संयम,  स्वयंशिस्त आणि पराकोटीची देशभक्ती खूप महत्त्वाची ..!! हीच आपली हत्यारे आहेत..!  वैद्यकीय शास्त्र यावर लवकरच उपाय शोधून काढेल आणि आज भस्मासुर वाटणारा कोरोना  मानवाच्या पुढे किडा-मुंगी समान वाटेल ..!! परंतु तोपर्यंत या मानवजातीला जगवणं, तगवण महत्त्वाच आहे ..! आणि शेवटी 'जान है तो जहाँन है ..!! शेवटी एवढेच स्वयंशिस्तीने घरी राहु या !! लढू या ..! विजय होऊया  ..!! 
धन्यवाद ..!! 
  • हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे

Friday, March 27, 2020

कोरोना आणि बंदिस्त मानव

तो घरात आहे ...
खूप दिवस,
बाहेरच पडत नाही ...!
चिमण्यांची चर्चा झाडावर.... 
सर्व प्राणी अचंबित..
काय झालं समजत नाही
 पण आता सिमेंट चा धुरळा नाही ..
गाड्यांचा धुर नाही ..
झाडांची तोडमोड नाही, 
आणि..जमिनीवर सिमेंटचा आवरण नाही ..
एक प्राणी म्हणाला,
 असं ऐकलंय की, आता तो बाहेर पडणारच नाही 
निसर्गाला त्रास दिल्याबद्दल त्याला पश्चाताप झालाय म्हणे ..!!सर्वच बंद केलय त्यांन , 
नद्यांमध्ये घाण कमी झालीय,
समुद्र आता मोकळा श्वास घेतोय,
डोंगर फोडायला ही तो येत नाही आजकाल..! 
 त्यांना उंच उंच इमारती बांधायचा नाहीत ...? 
वणवे लागून आपण होरपळलो,
त्याच्या कत्तली मधून सावरलो,
जंगलातून वाट फुटेल तिकडे पळालो, 
तो आपल्याला कुठेच राहू देत नाही...
ना बिळात, ना पाण्यात, ना झाडावर ...
 तो वेडा झाला होता का ...??
आपली मैत्री आणि जरुरत त्याला समजली नव्हती का ? 
 तो म्हणे सर्वात बुद्धिमान होता ...आपल्या प्राण्यांमध्ये ..!आपण हिंस्त्र आहोत म्हणे ....
पण तो तर .....
जाऊ दे ना यार .....सर्व प्राणी निराशेने म्हणाले....
पण मग..... बिघडलय
नक्कीच काहीतरी बिघडलय...
पण तो हार मानणारा नाही,
माहित आहे आम्हाला ...!
आणि त्याने हरू ही नये ...
अशी आमची इच्छा आहे आणि प्रार्थना सुद्धा ...! 
पण आम्हाला ही जगू द्याव...
आमच्या संगतीत राहावं ...
आमचा मित्र,  सखा ...पाठीराखा  होऊन ...
सर्व प्राणिमात्रांच्या वतीने,
 मानव पुन्हा मानवा सारखा होईल,
अशी प्रार्थना करूया ....तो आता सुधारला
आहे ..!! 
15 एप्रिल 2020 ....
अरे बापरे ....पळा रे पळा....
 एवढ्या गाड्या ...
अरे बापरे..... नाही तो नाही सुधारणार ...!!
आपण पळू या ....दूर ......
दूर अगदी खूप दूर ....परमेश्वराजवळ....!!
मानवाची कैफियत घेऊन...
आणि त्या विधात्याला विनंती करूया,
 प्रचंड बुद्धि दिलीस या मानवाला तू....
 आता थोडी अक्कल पण दे ..!!
सर्व प्राणिमात्रांना कडूनअर्ज सादर ...!!!
-- संजीवन म्हात्रे 
27 मार्च 2020