Tuesday, November 13, 2018

सकाळ अनुभवा ..!! जीवन समृद्ध बनवा ..!!

पूर्ण दिवसाचा मुड सकाळवर ठरतो.!!  सकाळ म्हणजे दिवसभराच्या नाटकाची नांदीच ..! जेवढी सकाळ प्रसन्न, तजेलदार आणि सकारात्मक ठेऊ, दिवस तेवढाच उत्तम आणि छान जातो..! निसर्गाने सकाळ यासाठीच निर्मित केली  असावी ..!! ऋतु कोणताही असु दे , सकाळ नेहमी नयनरम्य आणि सुंदर असते ..! पानांवर हळूच ओघळणारे दवबिंदू, नुकतीच येऊन गेलेली पावसाची सर, हिवाळ्यात सकाळी असणारी धुक्याची चादर, न बोचणार ऊन , शुद्ध हवा, शांतता ...हे सर्व आत्म्याला सुखावणारं..मनाला दिलासा देणारं ..!! सकाळी जर ध्यान लावुन निसर्गाकडे पाहिलं , तर परमेश्वराचा आभास झाल्याशिवाय राहणार नाही ..आणि तेवढ्यात आपल्या किरणप्रभा सर्व जगावर पसरवीत अवतीर्ण होणार सूर्य ..!! हे बघताना मन भारावून न जाईल तरच नवल ..!! निसर्ग द्यायला आलेला असतो सकाळी सकाळी ...! तो तयार करतो तुम्हाला पुर्ण दिवसासाठी..!!सकाळ निसर्गाच्या सानिध्यात जाऊन साजरी केली पाहिजे ..! रोज हा अमृताचा झरा, प्राशन  करून दिवसभराच्या आव्हानांसाठी तयार झालं पाहिजे..! व्यायाम, ध्यान करत असाल तर सकाळ आणखी छान होईल ..! म्हणून सकाळ अनुभवा.. जीवन समृद्ध बनवा .!!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Wednesday, November 7, 2018

अपमान

अपमानाचं काय घेऊन बसलात रे ...
सवय करायची त्याची ..!

मान मिळतो कुठं आजकाल ?
स्वच्छ , टिकाऊ , निकोप आणि स्वस्त ..! 

विकत घ्यावं लागतं सर्व काही ..
 बरं...मान साठवूनही  ठेवता येत नाही पैशासारखा ..

कोठारं हि भरता येत नाहीत धान्यासारखी त्याची ...
मग अपमान कशाला साठवून ठेवायचे ..?

जे  आपल्याला मान देत नाहीत ..
  त्यांच्याकडून अपमान कशाला स्वीकारायचे ..?

मान घ्यायची आपली पात्रता , पत नाही ..
तर अपमान देणार्याची सुद्धा पात्रता नाही असचं समजायचं...!

जगातली अर्धी भांडणं ' अपमान ' वर होतात ..
आणि जगातील सर्व नाती 'सन्मान ' वर जुळतात 

आणि हो , द्याल तेच परत येतं..महाराज ..!
अपमान द्याल तर अपमान परत येईल ...

तो स्वत:कडे कोण ठेवत नाही ..कधीही ..
म्हणून जगावेगळ व्हायचं असेल तर ...

अपमान दिला तर सांभाळून ठेवा
आणि तरीही ,,,....
सन्मान देण्याची पात्रता ठेवा ...ती वाढवा ...!
म्हणजे तुम्ही महान होण्याच्या वाटेवर  एक पाउल पुढे ...!!
    - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . ७ ऑक्टो. २०१ ६

Monday, July 23, 2018

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ..!

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ..!!

असंच काहीतरी होतं आषाढी एकादशीला ..! वैष्णवांच्या दिंड्या महाष्ट्रभर फेर धरू लागतात,आणि सारा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो .. आणि संतांचा महाराष्ट्र ही उक्ती मनोमन पटू लागते ..! ' भेदाभेद अमंगळ' शिकविणाऱ्या संतानी महाराष्ट्राला असं ज्ञान, असं वारसा , आणि  समाजप्रबोधनाचा असं वसा दिला आहे कि सारं त्रिभुवन यापुढे नतमस्तक होईल ...! ज्ञानदेवांनी रचलेल्या या 'वारकरी संप्रदायाच्या' पायावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस चढविला ..! ' एक एक ओवी अनुभवावी' अशीच भावना या साऱ्या संतांच्या अभंगरचना वाचताना वाटते. मन तल्लीन , भक्तिमय आणि शांत होते. ..! ज्ञानेश्वरांचे शब्द म्हणजे ईश्वरी ज्ञानच जणू ..अरे अरे ज्ञाना झाला से पावन
तुझे तुझ ध्यान, कळों  आले ...!
तुझा तूंचि देव , तुझा तू चि भाव
 मिटला संदेह अन्यतत्वी ...!!
वेडावून टाकतात हे शब्द ..! हे सगळ अनुभवताना 'दिव्यत्वाची प्रचीती' आल्यावाचून राहत नाही ..! विठ्ठलाने महाराष्ट्राला भक्तिमय केल आणि या भक्तिमार्गावर चालणाऱ्या  संतानी समाजाला सन्मार्गी लावण्याच आणि योग्य दिशा  देण्याच महत्कार्य केल ..! ' मनुष्य जन्माचे 'इहलोकीचे  कार्य ' सर्व संतानी उभ्या मानवजातीला समजावून सांगितलं. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' म्हणणाऱ्या जगदगुरु तुकाराम महाराजांचा शब्द म्हणजे रत्न च..! विठ्ठल भक्ती सांगताना तुकाराम महाराज म्हणतात ...
विठ्ठल जिविचा जिव्हाळा
विठ्ठल कृपेचा कोवळा
विठ्ठल प्रेमाचा उमाळा 
लावियेले चाळा ,
विश्व विठ्ठले ..!
आजच्या दिवसाला याची पुन्हा प्रचीती आल्याशिवाय राहत नाही ..! तुकोब्बरायांची एक एक ओवी अनुभवताना हरवून जायला होतं, ज्ञानाचा सागर पाहताना ....डोळे पाणावून जातात...एक वेगळी अनुभूती येते...! संत सांगतात....
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ..!
दु:खी गांजलेल्या समाजाला धीर देताना आणि परमेश्वर भक्ती हा उपाय सांगताना संत म्हणतात....
आवडीने भावे,
हरीनाम घेशी ,...
तुझी चिंता त्यासी,
सर्व आहे ...! 
शेवटी आषाढी एकादशी विषयी ...
पावलो पंढरी , वैकुंठ भवन ..
धन्य आजी दिन , सोनियाचा ....!
- संजीवन म्हात्रे ..!