Saturday, November 9, 2019

राजकारण 2019

तुम्ही करा खेळ 
        राजकारणांचे
आणि लपेटून घ्या पांघरून
        समाजकारणांची ..! 
द्या तिलांजली सद्गगुणांना
         सत्ताकरणासाठी ..!
आणि एकच मंत्र जपा, माफ असतं,
सर्व काही, प्रेमात , लढाईत 
          आणि राजकारणात ..!! 
तुमच्यामुळे राजकारण शिजू लागलंय
घरात, ऑफिसात, शाळेत...कुठेही ..!! 
कळप, टोळ्या , गट, संघटना ,पक्ष स्थापन होताहेत 
            स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी .. 
पूर्वी सुद्धा लढाया सत्तेसाठीच होत्या ...
आणि आताही सत्तेसाठीच आहेत ..! 
 चांगलं आहे ...
तलवारच्या ऐवजी लेखणी 
भाल्याच्या ऐवजी भाषणं..!! 
आणि आहेत , 
सोशल मीडियावरील भालदार, चोपदार..! 
तुम्ही घ्या सत्तेनंतर ..
गाड्या , बंगले , सगळे ऐशोआराम , अगदी विमानसुद्धा 
बळकवा जमिनी समुद्र मोठमोठाले कारखाने ..!! 
पण एक करा ...
शेतकऱ्याला न्याय द्या 
भ्रष्टाचाराच्या उरावर पाय द्या 
दहशतवाद्यांना तोडा
जातीयवादाला गाडा
माणुसकीला जोडा
कट्टरतेला सोडा
हातांना काम, प्रमाणिकपणाला इनाम, 
खोट्याना लगाम आणि सैनिकांना सलाम द्या ..!! आणि मग राजकारणाचे कितीही भोंगे वाजवा...
आम्ही सहन करू ..!! 
संजीवन म्हात्रे 
10 नोव्हेंबर 2019 

Tuesday, November 13, 2018

सकाळ अनुभवा ..!! जीवन समृद्ध बनवा ..!!

पूर्ण दिवसाचा मुड सकाळवर ठरतो.!!  सकाळ म्हणजे दिवसभराच्या नाटकाची नांदीच ..! जेवढी सकाळ प्रसन्न, तजेलदार आणि सकारात्मक ठेऊ, दिवस तेवढाच उत्तम आणि छान जातो..! निसर्गाने सकाळ यासाठीच निर्मित केली  असावी ..!! ऋतु कोणताही असु दे , सकाळ नेहमी नयनरम्य आणि सुंदर असते ..! पानांवर हळूच ओघळणारे दवबिंदू, नुकतीच येऊन गेलेली पावसाची सर, हिवाळ्यात सकाळी असणारी धुक्याची चादर, न बोचणार ऊन , शुद्ध हवा, शांतता ...हे सर्व आत्म्याला सुखावणारं..मनाला दिलासा देणारं ..!! सकाळी जर ध्यान लावुन निसर्गाकडे पाहिलं , तर परमेश्वराचा आभास झाल्याशिवाय राहणार नाही ..आणि तेवढ्यात आपल्या किरणप्रभा सर्व जगावर पसरवीत अवतीर्ण होणार सूर्य ..!! हे बघताना मन भारावून न जाईल तरच नवल ..!! निसर्ग द्यायला आलेला असतो सकाळी सकाळी ...! तो तयार करतो तुम्हाला पुर्ण दिवसासाठी..!!सकाळ निसर्गाच्या सानिध्यात जाऊन साजरी केली पाहिजे ..! रोज हा अमृताचा झरा, प्राशन  करून दिवसभराच्या आव्हानांसाठी तयार झालं पाहिजे..! व्यायाम, ध्यान करत असाल तर सकाळ आणखी छान होईल ..! म्हणून सकाळ अनुभवा.. जीवन समृद्ध बनवा .!!
- हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .

Wednesday, November 7, 2018

अपमान

अपमानाचं काय घेऊन बसलात रे ...
सवय करायची त्याची ..!

मान मिळतो कुठं आजकाल ?
स्वच्छ , टिकाऊ , निकोप आणि स्वस्त ..! 

विकत घ्यावं लागतं सर्व काही ..
 बरं...मान साठवूनही  ठेवता येत नाही पैशासारखा ..

कोठारं हि भरता येत नाहीत धान्यासारखी त्याची ...
मग अपमान कशाला साठवून ठेवायचे ..?

जे  आपल्याला मान देत नाहीत ..
  त्यांच्याकडून अपमान कशाला स्वीकारायचे ..?

मान घ्यायची आपली पात्रता , पत नाही ..
तर अपमान देणार्याची सुद्धा पात्रता नाही असचं समजायचं...!

जगातली अर्धी भांडणं ' अपमान ' वर होतात ..
आणि जगातील सर्व नाती 'सन्मान ' वर जुळतात 

आणि हो , द्याल तेच परत येतं..महाराज ..!
अपमान द्याल तर अपमान परत येईल ...

तो स्वत:कडे कोण ठेवत नाही ..कधीही ..
म्हणून जगावेगळ व्हायचं असेल तर ...

अपमान दिला तर सांभाळून ठेवा
आणि तरीही ,,,....
सन्मान देण्याची पात्रता ठेवा ...ती वाढवा ...!
म्हणजे तुम्ही महान होण्याच्या वाटेवर  एक पाउल पुढे ...!!
    - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे . ७ ऑक्टो. २०१ ६

Monday, July 23, 2018

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ..!

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ..!!

असंच काहीतरी होतं आषाढी एकादशीला ..! वैष्णवांच्या दिंड्या महाष्ट्रभर फेर धरू लागतात,आणि सारा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो .. आणि संतांचा महाराष्ट्र ही उक्ती मनोमन पटू लागते ..! ' भेदाभेद अमंगळ' शिकविणाऱ्या संतानी महाराष्ट्राला असं ज्ञान, असं वारसा , आणि  समाजप्रबोधनाचा असं वसा दिला आहे कि सारं त्रिभुवन यापुढे नतमस्तक होईल ...! ज्ञानदेवांनी रचलेल्या या 'वारकरी संप्रदायाच्या' पायावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस चढविला ..! ' एक एक ओवी अनुभवावी' अशीच भावना या साऱ्या संतांच्या अभंगरचना वाचताना वाटते. मन तल्लीन , भक्तिमय आणि शांत होते. ..! ज्ञानेश्वरांचे शब्द म्हणजे ईश्वरी ज्ञानच जणू ..अरे अरे ज्ञाना झाला से पावन
तुझे तुझ ध्यान, कळों  आले ...!
तुझा तूंचि देव , तुझा तू चि भाव
 मिटला संदेह अन्यतत्वी ...!!
वेडावून टाकतात हे शब्द ..! हे सगळ अनुभवताना 'दिव्यत्वाची प्रचीती' आल्यावाचून राहत नाही ..! विठ्ठलाने महाराष्ट्राला भक्तिमय केल आणि या भक्तिमार्गावर चालणाऱ्या  संतानी समाजाला सन्मार्गी लावण्याच आणि योग्य दिशा  देण्याच महत्कार्य केल ..! ' मनुष्य जन्माचे 'इहलोकीचे  कार्य ' सर्व संतानी उभ्या मानवजातीला समजावून सांगितलं. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' म्हणणाऱ्या जगदगुरु तुकाराम महाराजांचा शब्द म्हणजे रत्न च..! विठ्ठल भक्ती सांगताना तुकाराम महाराज म्हणतात ...
विठ्ठल जिविचा जिव्हाळा
विठ्ठल कृपेचा कोवळा
विठ्ठल प्रेमाचा उमाळा 
लावियेले चाळा ,
विश्व विठ्ठले ..!
आजच्या दिवसाला याची पुन्हा प्रचीती आल्याशिवाय राहत नाही ..! तुकोब्बरायांची एक एक ओवी अनुभवताना हरवून जायला होतं, ज्ञानाचा सागर पाहताना ....डोळे पाणावून जातात...एक वेगळी अनुभूती येते...! संत सांगतात....
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ..!
दु:खी गांजलेल्या समाजाला धीर देताना आणि परमेश्वर भक्ती हा उपाय सांगताना संत म्हणतात....
आवडीने भावे,
हरीनाम घेशी ,...
तुझी चिंता त्यासी,
सर्व आहे ...! 
शेवटी आषाढी एकादशी विषयी ...
पावलो पंढरी , वैकुंठ भवन ..
धन्य आजी दिन , सोनियाचा ....!
- संजीवन म्हात्रे ..! 

Wednesday, December 6, 2017

मेरे पास माँ है ...! - शशी कपूर ,


मेरे पास माँ है ...!
कुणी कलाकार गेला कि मनाला वेदना होतात ... खरं  म्हणजे कलाकार कधीही मरत नसतात ते रसिकांच्या मनात अमर होत असतात..! परवा शशी कपूर गेल्यानंतर असंच काहीतरी वाटलं ... दिवसभर मनाला चुटपुट लागून राहिली ... काहीतरी हरविल्यासारखं वाटलं .... खूप विचार केल्यानंतर याचा उघड झाला ...!
                     मागे विनोद खन्ना गेल्यानंतर असाच काहीतरी लिहावंसं वाटलं होतं ... आणि लिहिलंही होतं  आजही तसंच झालं ..!  कारण अमिताभ बच्चन , शशी कपूर , विनोद खन्ना, शत्रुघन सिन्हा , विनोद मेहरा ...या कलाकारांनी आमचं बालपण सुखकर केलं ..! सिनेमा मधून जे संस्कार झाले ते मनावर कायमचे कोरले गेले . ( पूर्वी सिनेमा मधून सुद्धा उत्तम संस्कार होऊ शकत असत ..! )  आई , वडील , मोठा भाऊ , लहान भाऊ , गुरु , बुजुर्ग , समाजामध्ये कसं वागावं हे चित्रपटातील हिरो च्या वागण्यावरून आम्ही शिकलो. शशी कपूर हा सुद्धा अतिशय उमदा , देखणा आणि कोणत्याही  'कॅरॅक्टर' मध्ये शोभणारा कलावंत ...!
                अमिताभ चा जमाना असताना, सगळ्या भूमिका अमिताभ यांच्या साठी लिहिल्या जात असताना , त्या काळात आपला स्वतंत्र ठसा उमटविणे इ खुप मोठी गोष्ट होती ..! दिवार  मधला प्रसंग ...दोन भावांमधील द्वंद्व... अमिताभ ला सही मागणारा इन्स्पेक्टर भाऊ ... अमिताभचे चे जबरदस्त ' जाव पहले ऊस आदमी का साईन  लेकरं आव ... असे जबरदस्त डायलॉग ...नंतर मेरे पास ..गाडी है , बंगला  है ...असा म्हणत...  क्या है तुम्हारे पास ? असा सर्वांची बोलती बंद करणारा सवाल ...भावनांचा कल्लोळ उभा करणारं  दृश्य ......अशा वेळी शशी कपूर यांनी चारच  शब्दांत हि लढत जिंकली ...मेरे पस माँ है ...! मुद्राभिनयाचा जबरदस्त अविष्कार शशी कपूर यांनी पेश केला आणि या एका डायलॉग ने अख्खी पिढी संस्कारित केली ..!
चार दशकानंतर सुद्धा.."  मेरे पास  माँ है .."! ह्या एका वाक्याचा प्रभाव आजही कायम आहे. याचं  क्रेडिट जसं सलीम - जावेद यांच्या लेखणीला तसाच शशी कपूर यांच्या उत्कट अभिनयाला सुद्धा ..! अमिताभ समोर काम करायला त्या काली कलाकार कचरत असताना शशी कपूर मात्र अमिताभ बरोबर अनेक यशस्वी चित्रपटात ठामपणे उभे राहिले . दिवार , कभी कभी , शान, इमान धरम , काला  पत्थर , त्रिशूल, सुहाग, नमक हलाल, सिलसिला असे अनेक चित्रपट सांगता येतील .
                अवखळ नाचणारा नायक ते धीर गंभीर पोलीस अधिकारी अशा शेकडो व्यक्तिरेखा शशी कपूर यांनी सहज साकारल्या. त्या काळातल्या नंदा , हेमामालिनी, रेखा, शर्मिला टॅगोर , मौशमी चॅटर्जी , झीनत , परवीन बाबी अशा अनेक दिग्गज नायिकांबरोबर पडद्यावर त्यांची जोडी जमली. आम्ही तारुण्यातआल्यानंतर शशी कपूर यांचा अभिनय समजायला लागला. निर्माता म्हणून काही त्यांनी चाकोरीबाहेरचे चित्रपट दिले . उत्सव , विजेता , ३६ चौरंगी लेन या चित्रपटांनी शशी कपूर यांची वेगळी ओळख रसिकांना दिली. पुढे तर ...अमेरिका आणि ब्रिटिश चित्रपटात काम करणारा पहिला भारतीय कलाकार म्हणून हि शशी कपूर  यांची ओळख होती .
                   मी व्यावसायिक नाट्यक्षेत्रात आल्यानंतर शशी कपूर यांची वेगळी ओळख समजली. व्यवसायिक चित्रपटातला हा यशस्वी कलाकार, नाट्यक्षेत्र पुढे येण्यासाठी धडपड करत होता. संपूर्ण हयात नाटकाचे दौरे करत घालविणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचं 'हक्काचं  नाट्यगृह हवं " हे स्वप्न ह्या बेट्याने पूर्ण करत नाटकासाठी 'पृथ्वी थियेटर'  उभं केलं. आपल्या मालकीच्या नाट्यगृहात सुद्धा तिकीट काढून येणार हा अवलिया नाट्यसंस्कृतीच एक जबरदस्त वारसा देऊन गेलाय ...!
                                  २०१५ मध्ये दादासाहेब फाळके, २०११ मध्ये पदमभूषण , आणि २०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळविणारा हा कलाकार ...आजच्या नवीन पिढीसाठी एक नायक , कलाकार निर्माता आणि त्याहूनही जास्त एक माणूस म्हणून आदर्श ठरावा ...!

मेरे पास माँ है ...हे म्हणताच
         तू डोळ्यासमोर येत राहशील ,
येणाऱ्या अनेक पिढयांना
एक नवा आदर्श देत राहशील ...!

तुझा चाहता - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे 

Monday, July 17, 2017

सावध व्हा ..!


नमस्कार ...!
सध्या ...नदी , धरण, जलाशय, तलाव, धबधबे, यामध्ये पोहताना होणारे तरुणांचे मृत्यू ...अशा रोजच्या बातम्यांनी हैराण आणि बेचैन व्हायला होतंय ...आनंद घेताना स्वत:च्या सुरक्षिततेविषयी असलेली दुर्लाक्षितता अनेकांच्या जीवावर बेततेय ...! रोजच्या या घटनांनी मन हळहळत...ज्यांच्या घरातला तरुण, करता पुरुष जातो तेव्हा त्यांच्या कुटुंबावर किंवा त्यांच्या बरोबर गेलेल्या त्यांच्या मित्रांवर किती गंभीर मानसिक परिणाम होत असतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही.  आपण याचा कधी गंभीरपणे विचार केला नाही ..करत नाही ..याची गंभीरतेची तरुणांना जाणीव करून द्यावी म्हणून या पोस्ट ची उठाठेव....!.
    नदी , धरण, जलाशय, तलाव, धबधबे, अशा ठिकाणी जाण्याचंसध्या फड आहे आणि ते वाढतेय . हे सव निसर्गप्रेम असेल असे आपण समजायचं का ? निसर्गप्रेम असेल तर निसर्ग  हा वर्षभरातल्या वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी रूपे धरण करतो ...अर्थात पावसाळ्यात तो खचितच सर्वात सुंदर असतो ...परंतु सध्या वीकेन्ड संस्कुती वाढतेय ...आपल्या मित्रांबरोबर ..कुटुंबाबरोबर अशा ठिकाणी जाऊन मजा करणे ...वाईट नाही ...परंतु तिथे जाऊन दारू पिणे, धोक्याच्या ठिकाणी जाऊन साहसी खेळ करणे , पाण्याचा अंदाज न घेता पोहणे यामुळे अशा दुर्घटना होताना दिसतात ..आणि अशा दुर्घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना टाळण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो ....
१. ज्या धबधबा , जलाशय, नदी,धरण, तलाव जिथे आपण जात आहोत त्याची भौगोलिक माहिती हवी ( उदा. नदीच्या पत्राची खोली, प्रवाहाचा साधारण वेग, वाढण्याची शक्यता, पत्रात असणारे खडक, धोके )
२. त्या ठिकाणच्या अपघातप्रवण जागा माहिती करून घ्याव्यात.
३. पोलीस आणि इतर तत्सम सुरक्षा यंत्रणा यांचे निर्देश माहित करून त्यांचे पालन करावे .
४. सुरक्षेसाठी अत्यावश्यक गोष्टी ( उदा. लांब दोरी , तरंगणारे गोल , प्रथमोपचार   साहित्य ) अशा गोष्टी बरोबर असाव्यात.
५. आपल्या मित्र परिवारात एक दोन लीडर नेमावेत आणि त्यांना उगाच साहस करणाऱ्या मित्रांना रोखण्याची जबबदारी द्यावी .
६. पैज लावणे , काहीतरी अचाट करायला प्रोत्साहन देणे टाळावे . हि दुर्घटनेची नांदी असते.
७. दारू, किंवा कोणतेही मादक पदार्थ सेवन  करू नये. घेऊनच जाउ नये .
८. सावध राहावे , चाणाक्ष राहावे , सुरक्षित राहावे आणि सहलीचा आनंद लुटावा ..!

आपल्याला उगाचच उपदेश करावा हा हेतू नाही ...!
मानवी जीव वाचवू या ...
यासारखा दुसरा मानवतेचा सेतू नाही ...!

आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे. 

Monday, July 3, 2017

धन्यवाद ..!

नमस्कार ..!
माझा वाढदिवस आपण सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन खूप भव्य केलात ...! माझ्या सर्व, चाहते, रसिक प्रेक्षक, मित्रमंडळी, नातेवाईक , हितचिंतक, समाजातील मान्यवर व्यक्ती यांनी दाखविलेल्या या प्रेमामुळे खरच भारावून गेलो आहे ...! आपण दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे एक नवीन स्फूर्ती नेहमीच मिळते ...!असेच प्रेम आणि अशीर्वंद असू द्या ...! सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ...!
मी आपुल्या प्रेम आणि आशिर्वादाला,
        विनम्रपणे स्वीकारतो ...!
रसिका तुझ्याचसाठी , आम्ही
         स्वतःला जोकर म्हणवितो ..!
आपल्या हशा आणि टाळ्यांची झिंग
          आम्ही वारंवार अनुभवतो .....!
आमुच्या प्रत्येक जन्मी, हे परमेश्वरा ...
         मी कलाकाराचा जन्म मागतो ...!
-आपला सर्वांचा - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे