Friday, May 12, 2017

माणसे आणि झाडे


                  परमेश्वराने माणसे आणि झाडे वेली निर्माण केली ..! दोन्हीही सजीव ..! प्रत्यक्षात परमेश्वराने प्राणी , पक्षी आणि वृक्ष, वेली निर्माण केली असावेत किंवा निर्माण झाले असावेत ( परमेश्वर आहे किंवा नाही या विषयात मी जात नाही ). माणूस हा पूर्वी प्राणी या प्रकारातच मोडत होता. वेगवेगळ्या आकाराची झाडं निर्माण केली परमेश्वराने, वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या उंचीची, पानांच्या वेगवेगळ्या प्रकाराची, खोडाच्या वेगवेगळ्या प्रकाराची, वेगवेगळ्या मातीत , पाण्यात , हवामानात रुजणारी , करोडो प्रकारची फुलं देणारी, फळ देणारी , जमिनीवर वाढणारी , जमिनीखाली वाढणारी , वेली म्हणजे आधार घेऊन वाढणारी , दुसऱ्या झाडाला शोषून वाढणारी परजीवी ...लाखो प्रकारची झाडे आपल्याला माहित आहेत ....!
           याचं प्रकारची माणसे सुद्धा आहेत ...तशिच ...करोडो प्रकारची माणसे ...वेगवेगळ्या रंगांची , उंचीची , वेगवेगळ्या गुणांची , अवगुणांची , काळी , गोरी, सावळी, लाल, निमगोरी , हजारो वर्णांची ...! एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही ...जेवढे झाडांचे प्रकार असतील तेवढ्या पेक्षा जास्त माणसांचे प्रकार असतील ...त्त्यात झाडांना धर्म नसतो ..जात नसते ...इथे माणसांनी धर्म , जाती, पोटजाती एवढ्या निर्माण केल्यात कि त्यांची गणती करवत नाही ...! प्रत्येक धर्माने , जातीने, पोटजातीने आपापला एक देव निर्माण केला आणि त्यांना नावही देऊन टाकली आणि मग आशा या रंगीबिरंगी दुनियेत आपला जन्म झाला. या वैविध्यपूर्ण दुनियेत माणसाने आनंदी , सुखी , मस्त जीवन जगणे साहजिकच अपेक्षित होते ...पण सगळा घोटाळा झाला .....
            झाडांमध्ये आणि माणसांमध्ये मुलभूत फरक आहे. झाडे जन्मापासून मृत्युपर्यंत एका जागी राहतात , कुठेही जात नाहीत , येत नाहीत , बोलत नाहीत, चालत नाहीत ....! आपल्या जवळ आलेल्या माणसाला , प्राण्याला सावली देणं , फळ देणं , फुलं देणं हे काम इमाने इतबारे करतात झाडं ...! कोणतीही स्तुतीची अपेक्षा नाही , सन्मानाची इच्छा नाही , पैसा साठवून ठेवायचा नाही , घर बांधायची नाही , इस्टेट कमवायची नाही , पोरांना मोठं करायचं नाही ....मस्त सुखी असावीत हि झाडे ....!!!
             माणसांचा इथेच मोठा प्रोब्लेम झाला....माणसे दुसऱ्यांच्या आयुष्यात दखल द्यायला लागली ...नाही स्वतः जगण्यासाठी त्यांना ती द्यावी लागली ...त्यामुळे माणसा-माणसांमध्ये तुलना सुरु झाली ...तुलनेमुळे स्पर्धा वाढली ....स्पर्धेमुळे धावपळ , दगदग , पळापळ सुरु झाली ..पूर्वीच्या काळात राज्य बळकावण्यासाठी युद्धे सुरु झाली ....माणसांच्या कत्तली झाल्या ...जीवघेण्या स्पर्धेसाठी ..अत्याधुनिक हत्यारे निर्माण झाली ...वेळ वाचविण्यासाठी वेगवान वाहने तयार झाली ....! आणि त्यानंतर माणसे पैसा कमविण्याच्या आणि साठविण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरली ...! विज्ञान युगात  भौतिक  सुखाच्या मागे धावताना त्यांना कसलीच परवा राहिली नाही ..! दुसऱ्याला कसं खाली खेचता येईल याचं विचाराने माणसे जगायला लागली ...स्वत: आनंद घेण्याचं सोडुन दुसऱ्याला कसं दु;ख देता येईल यातच मग्न झाली ...गुलझार यांनी खूप सुंदर लिहिलं आहे ....
\                   जिंदगी जाया कर दी.....
                         दुसरो के जिंदगी में झाकते झांकते....
                                  खुद के जिंदगी को तराशा होता
                                          तो फरिश्ते बन जाते ...!!!
अजूनही वेळ नाही गेलेली ...'सावर रे ' असाच म्हणावं लागेल ...थोडं थांबा ...विचार करा ...आयुष्य खूप छोटं आहे ...प्रत्येक क्षण स्वतः:चा आणि इतरांचा सुखाचा करा ....सर्वानाच हे माहिती आहे ...नवीन काही नाही ...तरीपण सांगण्याचा फुटकळ प्रयत्न केल्याशिवाय राहवलं नाही ...कारण आयुष्य तुमचं...विचार तुमचे ...आचरण तुमचं ...आणि हो ...त्यातून येणारे परिणाम पण तुमचेच ....कुठल्यातरी कवीने म्हटलं आहे ...
                                 हर एक लम्हें से ..
                                      खुशिया निचोड लो यारो ...
                                                घडी जो बीत गयी.....
                                                           लौटकर नाही आती .....!!!
                                                                                                - हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे .